...तिचं आणि माझं...' जग दोघांचं '....
या माझ्या काव्यसंग्रहातील..
लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या माझ्या काही निवडक कविता ...

Monday, August 23, 2010

तुझे डोळे


तुझे डोळे

तुझे डोळे सांगती मजला,
जवळ ये न साजणा दुरावा कसला
तुझे डोळे सांगती मजला...

नजरेतली जादुगिरी
एकांती या छळते खरी
सांग ना रे हा तुझा इरादा कसला
तुझे डोळे सांगती मजला


ही वेळ रे माझी तुझी
तुजला हवे ते मागायची
का तू असे विचारत बसला
तुझे डोळे सांगती मजला,


सोडू नको रे माझ्या मिठीला
संपून जाते हि घटिका कशाला
ओठ ओठात का अचानक रुतला
तुझे डोळे सांगती मजला

कवी किरण

Saturday, August 21, 2010

मी एकटाच किनारी चुकलेलो ....


मी एकटाच किनारी चुकलेलो ....

दुखवून तुला का मजला आनंद होतो राणी
अश्रू वाहिले तिथे, इथे गालांवर ओघळले पाणी
एका चुकीला विसरून माझे प्रेम लक्षात येईल का
हि ऐलतीराची नाव, राणी पैलतीरावर जाईल का

तू सदैव माझ्यासाठी, केले रक्ताचे पाणी
दुर्लक्षित झाले सूर, अन विसरून गेलो गाणी
तोच कंठ पुन्हा एकदा, माझ्यासाठी गाईल का
हि ऐलतीराची नाव, राणी पैलतीरावर जाईल का

तू शीतल सरीतेसारखी मी अवखळ सागर आहे
तू अथांग विश्व प्रेमाचे मी रीतीच घागर आहे
बोल राधे तुझा नि माझा सुरेल संगम होईल का
हि ऐलतीराची नाव, राणी पैलतीरावर जाईल का

चुकलो मी नाही कळले, शब्दात जाहला घोळ
मग क्षणात बिथरून गेला, प्रेमाचा झाला खेळ
मी एकटाच उभा किनारी तुजवीण जीव हा राहील का
हि ऐलतीराची नाव, राणी पैलतीरावर जाईल का

कवी किरण

आरसा


आरसा

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
तुला कळेल तू किती लाडकी आहेस कुणासाठी
तुझी अदा किती गोड,
तू इतकी सुंदर कशासाठी ....

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
खूप काही वेगळं दिसेल तुला
जे तू यापूर्वी कधीच पाहिलं नव्हत
काहीतरी आश्चर्यचकित करणारं
जे अगोदरही तुझ्या अगदी जवळ होतं

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
गालांवर ओघळेल तुझ्या लाली
सेच्कांदागानिक मिचमिचणाऱ्या
तुझ्या पापण्या वरखाली

आरश्यात बघ माझ्या नजरेतून

आणि हो नजर काढ बरं स्वतःची
लागू नाय याच्यासाठी
कारण तुझी अदा किती गोड,
तू इतकी सुंदर कशासाठी ....

दिवसा फोन रात्री एस एम एस... !


हि कविता त्या वेड्या प्रेयासिंना समर्पित ज्या आपल्या प्रियकरासाठी दिवसरात्र मोबाईल वेड्या आहेत.....



दिवसा फोन रात्री एस एम एस... !



पूर्ण दिवसभरात मी, इतके फोन करते

तरी रात्री डोळे फाडून, एसेमेस तुला करते



घरच्यांना लपवून हळूच, चादरीत घुसून बसते

तुझे रिप्लाय वाचून, गालातल्या गालात हसते

कुणी येतंय कळताच, झोपायचं नाटक करते

रात्री डोळे फाडून, एसेमेस तुला करते



खूप वेळ टाईप करून दुखू लागते बोट

खूप वेळ पाण्याविना सुकतात माझे ओठ

आठवणीच्या अश्रूंनी मग त्यांना ओले करते

रात्री डोळे फाडून एसेमेस तुला करते



कुणी विचारताच.. “झोप येत नाही !” कारण दिलं जातं

भीती वाटते जेव्हा हे सारं मोठ्यांच्या लक्षात येतं

मोबाईल मग हातात लपवून दुसऱ्या कुशीत फिरते

रात्री डोळे फाडून एसेमेस तुला करते



कळत नाही बोलता बोलता अर्धी रात्र होते

सकाळी पुन्हा लवकर उठायचं... याची याद येते

अर्ध्या रात्री नंतर मग “गुड नाईट” तुला करते

चोवीस तासाचे घड्याळ माझे तुझ्याच साठी फिरते !



कवी किरण

Wednesday, August 18, 2010

बाईकवरची धूम ......


बाईकवरची धूम ......

चंद्रालाही लाजवून गेलं असं तुझं हसणं,
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

भेटण्यापर्यंतची अगतिकता, कोंडलेला श्वास
त्यात ट्राफिक, धूळ आणि ट्रक टेम्पोंचा त्रास
मिळेल तसा रस्ता काढत फुटपाथवरून घुसणं
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

मग तू दिसतेस लांबून, वाट बघत थकलेली
इतरांच्या चेहऱ्यांना उत्तर देत, उभ्या उभ्या पकलेली
हिरमुसलेला चेहरा आणि खूप सार रुसणं
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

पाच दहा मिनिटं काही बोलणं होत नाही
लांब रेटल जात, जवळ घेणं होत नाही
रागावलेल्या राणीचं, रुसून फुगून बसण
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

थोडावेळ गेल्यानंतर, पंचनामा होतो
उशीर का केला, म्हणून सगळी कारण देतो
त्यांनंतर हळू हळू, पुढे सरकून बसणं
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

मग सुरु राजा राणीचा, स्वप्नंनगरीचा प्रवास
घट्ट बसते मिठी आणि मोकळे होतात श्वास
खांद्यावरती हात सरकतो, कठीण होता सुचण
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं




रोमांचित होताहोता, हॉटेल जवळ येत
कोणी नाही, नजर चुकवून मगच जाता येत
तिथे सुद्धा, हातात तुझं हात घेऊन बसणं
खूप आवडतं बाईकवर तुझ्या सोबत असणं

बिल चुकतं, मन थकत,निघायचे वेध लागतात
डोळे मग दोघांचेही, घड्याळाकडे बघतात
मग मात्र चालू होतं, मनात धूस पुसणं
खूप आवडतं बाईकवर तुझ्या सोबत असणं

निघता निघता रात्र होते, चांदण पडलेलं असतं
हातांनी तुझ्या कवेत मला,घट्ट धरलेलं असतं
पुन्हा नॉर्मल होतं, मग सरकून बसणं
खूप आवडतं बाईकवर तुझ्या सोबत असणं

निरोप घेतेस, निघून जातेस, आठवणी मात्र तश्याच राहतात
मिरर मध्ये पुन्हा पुन्हा, तुलाच माझे डोळे पाहतात
परत कधी ? या उत्तराची वाट बघत बसणं
खूप आवडतं बाईकवर तुझ्या सोबत असणं

कवी किरण

Friday, August 13, 2010

स्वातंत्र्य दिन


स्वातंत्र्य दिन

शहीदांनी साजरा केला होता...

ब्रिटीश राजवटीतून आता हिंदुस्तान एक स्वतंत्र राष्ट्र होणार म्हणून ...
जगाच्या नकाश्यावर आता भारत छापून येणार म्हणून...
स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार म्हणून ...
प्रत्येक वेळी तिरंगा अभिमानानं सलाम घेणार म्हणून...


आम्ही आमचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय....

रविवारी १५ ऑगस्ट येतोय म्हणून एक सुट्टी गेली याचा खेद व्यक्त करत,
जमतील तितकी टाळकी गोळा करून मागच्या वर्षी साजरा केला म्हणून या वर्षी सुद्धा... रडत रडत,
तिरंगी रंगाचे कपडे घालून मी कसा किंवा कशी दिसतेय या आनंदात जगत,
आणि रोजच्या सिरीयल मधून रिमोट ने अधून मधून न्यूज वरच्या परेड बघत...

मग आता मी काय करू त्याला.... ?

असा प्रश्न निर्माण झाला असेल तर बरंच काही आहे करण्यासारखं...
या स्वातंत्र्य दिनी एक स्वप्नं बघून पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण करण्यासारखं

नॉट नेसेसरी .... आपण लढायला जायला हवं...
पण आपल्या कडे जे आहे त्यातलं थोडं गरिबाला द्यायला हवं
शिक्षण पासून जे वंचित आहेत त्यांना जगण्यापुरतं शिकवायला हवं
आपल्या मुलाने सुद्धा जवान होण्याचा स्वप्न पाहायला हवं
हा अगदीच तितकी ताकद नसेल
तर इंजिनियरिंग करून भारतात राहायला हवं

तेव्हा नुसतंच “ भारत माता कि जय !” म्हणण्यापेक्षा
आज देशाला गरज आहे
तुमच्या मनातल्या आवाजाची...
एक नवी क्रांती घडवण्याच्या
काही नव्या रिवाजांची...
चला काहीतरी चांगल मनाशी ठरवू
आणि आपल्या देशाला जे खरच हवंय ते... जमेल तितकं पुरवू
.

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.....
कवी किरण

Saturday, August 7, 2010

गुड मॉर्निंग !!!!


सकाळीच तुझी आठवण आली
कानात काहीतरी बोलून गेली
स्वप्नात रात्री काय काय घडलं
सारी गुपितं खोलून गेली

आता दिवस कसा सुखाचा जाईल
काहीवेळाने तुझा फोनही येईल
दुधात खरी साखर पडेल
जेव्हा तुझ्या आवाजात गुड मॉर्निंग होईल

फोन नाही जमला तर एसेमेस कर
तेही नाही जमलं तर माझं नाव मनात धर
घाबरू नकोस मी रागावणार नाही
वाट बघेन तुझी आयुष्यभर

किती वेळ


तू तिथे आणि मी इथे..
असं कसं बरं चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

खूप झाला विरह आणि
खूप झालं काम
भेटली नाहीस तर घ्यावं लागेल,
कायमचं हरीनाम
किती दिवस किनाऱ्यावर,
असं एकट्याने चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

करियर पैसा बंगला गाडी,
सगळं सगळं विकत मिळतं
आपलं कुणी हक्काचं हवं,
हे बहुतेकांना उशिराच कळतं
असं काळ वेळ ठरवून बोलणं,
आपल्यात नाही बुवा चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

ठावूक आहे नुसत्या प्रेमाने,
सारे प्रश्न सुटणार नाही
पण प्रेम मोज्क्यांच्याच नशिबात असतं,
ते सारखं सारखं भेटणार नाही
वाटतं दूर हिंदोळ्यावर,
फक्त दोघांनीच झुलायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

खूपच उशीर केलायस राणी,
म्हणून सांगतो थेट तुला
गुपचूप जशी भेटायचीस,
तशी हळूच येऊन खेट मला
मनाची समजूत घालून थकलो..
कि प्रेमात हे असं चालायचंच
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

Wednesday, August 4, 2010

मांडीवरती डोकं ठेवून...


मांडीवरती डोकं ठेवून...



खूप झालीय धावपळ, थोडा आराम हवाय खरा,

मांडीवरती डोकं ठेवून...झोपू का गं जरा ?



सकाळ दुपार संध्याकाळ, कामात निघून जाते,

अधून मधून सारखी मला, तुझी आठवण येते,

पण मिळतो जेव्हा वेळ तेव्हा, वाजले असतात बारा !

मांडीवरती डोकं ठेवून...झोपू का गं जरा



ऑफिस संपताच आईचा फोन “राजे कुठे आहात?”

पप्पांचे डोळे असतात सारखे घड्याळाकडे पाहात

कधी संपणार आयुष्यातला हा ससेमिरा

मांडीवरती डोकं ठेवून...झोपू का गं जरा



वाटत दूर पळून जावं जंगलात कुठेतरी

जिथे नसेल वेळेसाठी अशी हेराफेरी

इतका प्रेम करेन कि म्हणशील तू लांबच बरा :-)

प्लीज...मांडीवरती डोकं ठेवून..झोपू का गं जरा



कवी किरण

Sunday, August 1, 2010

मैत्री....











मैत्री....

अपेक्षा नसतात आणि उपेक्षाही नसतात
मैत्रीत असते फक्त ओढ..एकमेकांसाठीची
नुसत्या आठवणीत सुद्धा ते एकमेकांना भेटतात,
गरज नसते .. खऱ्या भेटीची

मैत्री म्हणजे निस्वार्थीपणाचा आदर्श
मैत्री म्हणजे आपलेपणाचा प्रेमळ स्पर्श
उघड्या डोळ्यांनी पाहिलेली असतात ती स्वप्नं रेशिमगाठीची
मैत्रीत असते फक्त ओढ..एकमेकांसाठीची

मैत्री एक अलिप्त आयुष्य, या जगाहून नामानिराळं
मैत्री म्हणजे एकमेकांच्या बंधनात गुंफलेलं अथांग जाळं
त्यात असते ठेचून भरलेली हुरहूर कुणासाठीची
मैत्रीत असते फक्त ओढ..एकमेकांसाठीची

मैत्री एक असं क्षितीज आहे जिथे आभाळ जमिनीला टेकतं
मैत्री असं एक लव्हाळं आहे जे अहंकार सोडून मित्रांसाठी झुकतं
मैत्री असते सर्वाचा शेवट आणि सुरवात वेड्या प्रीतीची
मैत्रीत असते फक्त ओढ..एकमेकांसाठीची

कवी किरण

Friday, July 30, 2010

लोणच्याची फोड



आयुष्यात खूप माणसं येतात
काही तिखट काही गोड असतात
पण त्यातली तुझ्यासारखी मोजकीच....
लोणच्याची फोड असतात

आई


आई.."आत्म्यातला ईश्वर"..असा .. ज्याला मंदिरही अपुरं पडावं,
जिच्या कुशीतून बाहेर पडताच खऱ्या जगाचं दर्शन घडावं

खरं जग... जे खरं तर खोटं असतं...
खोटं हसणं, खोटं दिसणं.. ज्यात काहीच तथ्य नसतं
खरेपणा फक्त तिच्यात असतो...
काळजी प्रेम आणि भरवसा याचा अर्थ फक्त तिच्यात दिसतो
खूप दमल्या नंतर वाटत कुशीत जाऊन धाय मोकलून रडावं
आई.."आत्म्यातला ईश्वर"..असा .. ज्याला मंदिरही अपुरं पडावं,
भाकरीच्या दोन तुकड्यांसाठी वण वण फिरल्यावर कळत..
तिने घरट कसं सांभाळल असेल
आम्हा भावंडांच्या भुकेला भागवताना तिने किती दुखः गिळल असेल
देवळात दर्शनाच्या लांबच लांब रांगा लावण्यापेक्षा रोज तिच्या पाया पडावं

आई.."आत्म्यातला ईश्वर"..असा .. ज्याला मंदिरही अपुरं पडावं,

तिचं अस्तित्व नुसत्या हाकेतच जाणवतं,
वात्सल्याच्या डोहात बुडून जाण्यासाठी तिचं आपलेपण मनापासून खुणवत
पण आपण ....आपण मात्र खूप मोठे झालेले असतो ,
एव्हाना प्रेम म्हटल्यावर फक्त मैत्रीण किंवा बायकोचा चेहराच पहिला दिसतो
तिने शेवटपर्यंत त्याग सहन करावा आणि कोपऱ्यात कुठ तरी जाऊन रडावं

आई.."आत्म्यातला ईश्वर"..असा .. ज्याला मंदिरही अपुरं पडावं,

मित्रांनो तिच्या प्रेमाची किंमत करोडोहून जास्त आहे
आणि करोडोंच हेच प्रेम जगात सगळ्यात स्वस्त आहे
म्हणून एकदातरी तिच्या जवळ जा आणि विचारा "कशी आहेस माझ्या प्रीतफुला "
आठवतेय का तिनेच सांगितलेल्या काळजाची गोष्ट "बाळा.. लागल कारे तुला ?"
असा हा मायेचा समुद्र ज्यात खूप खोलवर बुडावं
आई.."आत्म्यातला ईश्वर"..असा .. ज्याला मंदिरही अपुरं पडावं,

पावसा सारखी भेट !




बरसणाऱ्या पावसात, कपड्यांना सावरत,
भर दिवसामधल्या साऱ्या नजरांना बावरत ,
स्वतःलाच बघून, आज ती लाजली असेल
मुसळधार पावसात जेव्हा, ती भिजली असेल

वारासुद्धा भोवरयासारखा, छान सुटला असेल
गोल गोल चकरा मारून, तिला भेटला असेल
केस मोकळे सोडल्यावर, काळीज जाईल चरकून
कारण... पाउस सुद्धा तिला, घट्ट चिकटलेला असेल


पावसाचा काही दोष नाही, तो असा बरसणारच
बिचारा ४ महिन्यांचा सोबती, भेटीसाठी तरसणारच
म्हणून तो झिम्माड पडतो...तुझ्यासाठी मनापासून
माझ्या सारखा सेम टू सेम.. तन मन धनापासून

आपलं गणित पावसा सारखं, मिळेल तितकं भेटू
माहित नाही आयुष्याचा, कधी बदलेल ऋतू
एकदा फक्त भिजण्यासाठी.. खूप सारी सजून जा
विसरून सारं तू सुद्धा पावसासोबत भिजून जा

कवी किरण

तू नसताना


















तू नसताना ....

तू नसताना असे वाटते, कोणीच नाही माझे
ढासळलेल्या बुरुजाच्या, किल्लाचे आम्ही राजे

फुल असे हातात तरीही, असंख्य बोचती काटे
तू नसताना चंद्रकोर हि, अर्धी तुटकी वाटे
असंख्य वादळ मनी घूसळती, भलते काहूर माजे
तू नसताना असे वाटते, कोणीच नाही माझे

तू नसताना वेळ मोकळा, म्हणतो काय करावे
मी हि त्यांला म्हणतो चल, नियतीचे पाय धरावे
संगीत जाई संपावरती, किन्नर कानी वाजे
तू नसताना असे वाटते, कोणीच नाही माझे

तू नसताना काहीच नाही, उरले माझ्यापाशी
झोपही गेली मी तळमळतो, घेऊन जाग उश्याशी
शरमिंदा झाले नशीबहि, ठाऊक नाही उद्याचे
तू नसताना असे वाटते ,कोणीच नाही माझे

कवी किरण

थकवा



नवी संकटं नवे आजार वाट माझी बघत असतात
जुन्या जागेची नवी दुखणी रोज मला हसत असतात
मी हि आपला सहन करतो देवाशी नुसताच बोलत राहतो
पदरात पडेल तेवढा त्रास आज काल मी झेलत राहतो
चारोळीकार - कवी किरण

...अधांतरीचे सूर ...





कवितेतल्या शब्दातही जे राहिले सांगायचे
आज या गझलेतुनी ते सूर सारे गायचे

तो चंद्रमा नभातला मज, सारखा बघायचा
मग चादरीच्या चांदण्या तो सारखा पुसायचा
इच्छा मनीची मागता पण कोणीना तुटायचे
आज या गझलेतुनी ते सूर सारे गायचे

मजपाशी होते क्षण तुला एकांती ग भेटायचे
देहास होत्या भावना पण ‘ते’ मनी ना यायचे
पावित्र्य जे स्पर्शातले होते मला राखायचे
आज या गझलेतुनी ते सूर सारे गायचे

लग्नातला चेहरा तुझा अस्मानीच्या परीसारखा
मी सुद्धा होतो सवे पण एकला नि पोरका
झाली होती तू वधू पण राहिलो मी वर व्हायचे
आज या गझलेतुनी ते सूर सारे गायचे
कवी किरण

दुष्ट



सकाळी तुझे स्वप्न, आठवणीतली रात्र
मध्यान्ही जेवताना हि आठवतोस, कातरवेळी तुझेच चित्र
इतकी याद छळते, तुझीमजला चित्रविचित्र
लवकर कधी भेटत नाहीस पक्का दुष्ट आहेस मात्र

Thursday, July 29, 2010

खरं उत्तर काय होतं ..




खरं उत्तर ... तुझ्या डोळ्यातलं

तुझं हसण, तुझं बोलणं....
तुझं असं समजून वागणं
हळूच चोरून डोळ्यात बघणं
सारं मला छळून गेलं
सोडताना हाथ माझा
मागे जेव्हा वळलीस तू,
खरं उत्तर काय होतं
डोळ्यात तुझ्या कळून गेलं

नाही येणार म्हणालीस तरी
शेवटची भेट म्हणून आलीस
जाता जाता मात्र पुन्हा
एकदाच भेटेनअसं सांगून गेलीस
तू फक्त हाथ मिळवलास
वाटलं सारं शरीर जाळून गेलं
खरं उत्तर काय होतं
डोळ्यात तुझ्या कळून गेलं

आलीस कधी आणि गेलीस कधी
वेळ कशी निघून गेली
वाटलं माझी परी मला
स्वप्नामध्ये भेटून गेली
भीती आणि अपराधीपण
तुला भेटताच पळून गेलं
खरं उत्तर काय होतं
डोळ्यात तुझ्या कळून गेलं

भेट पुन्हा.... कसा सांगू
तुला पेचात कसा टाकू
पण माझ्या मनाची हुरहूर तरी
सांग मला मी कशी झाकू
गेलीस तेव्हा असं वाटलं
कुणी अचानक वळून गेलं
खरं उत्तर काय होतं
डोळ्यात तुझ्या कळून गेलं

कवी किरण

दुप्पट प्रेम...



मैत्रीच मधाळ गाणं
तुला भेटल्यावर जूळल,
कसा गुंतत गेलो
माझं मलाच नाही कळलं

पहिला तुझा आवाज आवडला
नंतर तुझे डोळे
भेटल्यानंतर पडले आणखीन
एक पाऊल खुळे

धडाधड तू बोलत राहिलीस
मला चान्सच नाही दिला
कारण तुझ्याकडे बघता बघताच
जीव वेडापिसा झाला

मग माझी वेळ आली
तुला काहीतरी सांगायची
इतक्या लवकर कस बोलू
लाज वाटली मागायची

या अगोदर आय लव्ह यु
खूप जण म्हणाली असतील
मग त्यात...माझ्या भावना
तुला वेगळ्या कशा दिसतील

पण तरीही धीर केला
आणि सांगून टाकल सारं
तू दचक्लीस क्षणभर
थांबलं हेल्कावणार वारं

विषय बदललास पटकन
माझं उत्तरच नाही दिलस
पण नाही सुद्धा म्हणाली नाहीस
यानच कन्फ्युस केलस

आजही तू तशीच आहेस
आपल्या मनाची राणी
मी पण आता विसरून गातोय
तुझ्यासोबत गाणी

नाही परवा आता मला
तूझ्या उत्तराची
पण अजून सुद्धा साथ आहे
तुझ्या अत्तराची

ठरवलंय स्वप्नाच्या नगरी मध्ये
तुझ्या सोबत फिरायचं
जितक पदरात मिळेल.......

त्याहून दुप्पट प्रेम करायचं

फोन...



तुझ्या एका फोनसाठी
मरणारा माणूस मी
तुझ्या एका हसण्यासाठी
जगणारा माणूस मी
तुझ्या डोळ्याच्या बाहुल्या
सदैव भिरभिरणाऱ्या
पण तुझ्याकडे एकटक
बघणारा माणूस मी





तुझ्याशी बोलताना कुणीच नसावस वाटत
कुणी नाही बघून फोन करावा तर पुढ्यात कोणीतरी खेटत
बोललो नाही मनाला तर चैन पडत नाही
का तुझ्या सोबत एकांताचा वेळ मिळत नाही

तुझं हसण....



तुझं हसण म्हणजे..
तुझा मनापासूनचा प्रतिसाद
तुझ्या गुलाबी गालांवरचा
आनद मनमुराद
कुणालाही वेड लावेल
असं तुझं हसण
आवडतं तुला हसताना
तासनतास बघत बसणं

तुला भेटायचं आहे....


तुला भेटायचं आहे....

थोडं सुखं थोडं दुखः तुला वाटायचं आहे
खुप दिवसांनी मला.... तुला भेटायचं आहे,

तू म्हणाली होतीस, मला बोलवं कधीही
माझ्या मनाचा हिंदोळा, येऊन झूलवं कधीही
शेवटचा ग संसार, आज थाटायचा आहे
खुप दिवसांनी मला.... तुला भेटायचं आहे,

मन दिशाहीन झाले खूप कोंडलेत श्वास,
त्यात सतावतो मला तुझ्या भेटीचाही ध्यास
साऱ्या बंधनातुनी आज सुटायचं आहे
खुप दिवसांनी मला.... तुला भेटायचं आहे,

असशील गुंतलेली तुझ्या दुनियेत तुही
ठरवले होते खूप.. तुला सांगायचे नाही
पण गुंतलेल्या जिवा मुक्त सुटायचे आहे
खुप दिवसांनी मला.... तुला भेटायचं आहे,

तू येशील न येशील, माझं सांगण्याचं काम,
वाट पाहतोय माझी, तिथे वेडा मुक्तिधाम,
जड होऊनी शेवटी आज आभाळ फाटलं
तुझ्या मिठीत ते सारं घट्ट मिटायाचं आहे
खुप दिवसांनी मला.... तुला भेटायचं आहे

कवी किरण

वाढदिवस


















वाढदिवस

आयुष्यातला असा एक दिवस जो मनाच्या कोपऱ्यात राखून ठेवावासा वाटतो
कारण या निमित्ताने साऱ्या जुन्या आणि नव्या मित्रांना आपण खूप जवळून भेटतो

कुणी शुभेछा आठवून काढून देतात
तर काही जण न शुभेछा देता सुद्धा डोळ्यासमोर येतात
असे कसे विसरले हे ? प्रश्न मनाला खेटतो
आयुष्यातला असा एक दिवस जो मनाच्या कोपऱ्यात राखून ठेवावासा वाटतो

आईच्या डोळ्यात कळत आपण किती मोठे झालो आहोत
मागे वळून पाहिल्यावर समजत आपण कोणत्या परिस्थितीतून गेलो आहोत
सुख दुखांच्या आठवणींनी मग पुन्हा कंठ दाटतो
आयुष्यातला असा एक दिवस जो मनाच्या कोपऱ्यात राखून ठेवावासा वाटतो

सचिन तेंडूलकर सारखं आपल्यालाही वाटतं अजून लांबचा पल्ला बाकी आहे
आणि असंही वाटतं जे मिळालं त्यातही मी सुखी आहे
जगलेल्या पैकी आज अविस्मरणीय क्षण आपण शोधतो
आयुष्यातला असा एक दिवस जो मनाच्या कोपऱ्यात राखून ठेवावासा वाटतो

कुणी म्हणतं आज आयुष्य एका वर्षाने कमी झालं
पण खरा तर हाच तो दिवस जिथे कळत आपण आयुष्यात काय काय केलं
याच दिवशी तर आयुष्याचा पुढील प्रवास डोळ्यासमोर थाटतो
आयुष्यातला असा एक दिवस जो मनाच्या कोपऱ्यात राखून ठेवावासा वाटतो

याला काय अर्थ आहे?


याला काय अर्थ आहे?











मनासारखं जगला नाहीत, तर सारं जीवन व्यर्थ आहे,

जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?

कुणाला तरी आवडेल म्हणून, नाटक करत बसायचं

मनात जरी द्वेष असला, तरी खोटं हसायचं..

उठतोय, झोपतोय, खातोय, पितोय.. काहींना यातच परमार्थ आहे

जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?

पैसा इज्जत शोहरत, सारं सारं निघून जाईल

जे करायचं राहिलं होतं, त्यात जीव अडकून राहील

देव पूजेमध्येसुद्धा, उरला फक्त स्वार्थ आहे

जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?

आम्ही नाही आत्महत्या, आणि खून करणारे

आम्ही तर आहोत मनाच्या, सौंदर्यावर मरणारे

आत्मा चिरंतन आहे, शरीर थोड्या वेळा पुरतं आहे

जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?

खूप कलाकार वेळ नाही, म्हणून रिकामी बसले आहेत

आयुष्याच्या रंगमंचावर, रोजच्या कामात घुसले आहेत

त्याला सुख कसं म्हणावं, जे तात्पुरतं आहे

जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?

म्हणून जगा आवडेल तसं, कुणाचं नुकसान करता,

आयुष्याला व्यसनांच्या, डोहामध्ये भरता

स्वतःवरती प्रेम केलंत तर, तुमचा जन्म सार्थ आहे

कारण... जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?

कवी किरण

Wednesday, July 28, 2010

धोका


धोका

मी तुझ्यावर प्रेम केलं ,

तू नुसती मैत्री

मी ठेवला विश्वास

तू केलीस ती खात्री



मी सारखा चालत राहिलो

तू मात्र मध्येच थांबलीस

जखम म्हणून मी लावलं मनाला

तू मिठासारखी झोम्ब्लीस

आवरत होतो स्वतःला

तेव्हा पुन्हा जवळ आलीस

पुन्हा स्वप्नात एकट सोडून,

चक्क.... निघून गेलीस

तुझं नाव फोन बुक च्या,

लिस्ट मध्ये बोल्ड केलं

कुणाचा तरी फोन येतोय

सांगून तू मात्र होल्ड केलं

तोच कुणाचातरी आज

तुझ्या जगाचा राजा झालाय

मी इथे उभा एकटा

तिथे लग्नाचा गाजावाजा झालाय

मनात रिकामी घुसमट चाललीय

थांबलाय आता झोका

शपथ मोडून जो दिलास

हाच तो का धोका ?

....कवी किरण

तिच्यात भिजलेला पाऊस....



तिच्यात भिजलेला पाऊस....

माझ्या इतकाच तोही, तिच्या प्रेमात भिजला होता

त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता

कधीच भेटल्यासारखा ,कोसळत होता बरसत होता

आढी वेढी वळणं घेऊन, बिलगण्यासाठी तरसत होता

त्यानं मिठीत घेताच.. काळजाचा ठोका वाजला होता

त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता

कधी रिमझिम, कधी मुसळधार, श्रावणधारा पडत होत्या

इतक्या दिवसांचे उसासे, आसमंतात सोडत होत्या

कस्तुरीचा मादक गंध, तनामनात रुजला होता

त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता

ऋतू येतात ऋतू जातात, तिचं सौंदर्य अबाधित असतं

बदलत्या ऋतूप्रमाणे, ते बदलत्या रंगात दिसत

अप्सरेच्या येण्यानं जसा, इंद्र दरबार थजला होता

त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता

खूप दिवसा नंतर तिला, असे भिजावेसे वाटले होते

ओलेचिंब करण्याकरता, प्रीतीचे मेघ दाटले होते

खूप बरसल्यावर मांडीवरती, डोकं ठेवून निजला होता

त्या दिवशी तिला पाहून, चक्क पाऊस लाजला होता

कवी किरण