...तिचं आणि माझं...' जग दोघांचं '....
या माझ्या काव्यसंग्रहातील..
लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या माझ्या काही निवडक कविता ...

Monday, August 23, 2010

तुझे डोळे


तुझे डोळे

तुझे डोळे सांगती मजला,
जवळ ये न साजणा दुरावा कसला
तुझे डोळे सांगती मजला...

नजरेतली जादुगिरी
एकांती या छळते खरी
सांग ना रे हा तुझा इरादा कसला
तुझे डोळे सांगती मजला


ही वेळ रे माझी तुझी
तुजला हवे ते मागायची
का तू असे विचारत बसला
तुझे डोळे सांगती मजला,


सोडू नको रे माझ्या मिठीला
संपून जाते हि घटिका कशाला
ओठ ओठात का अचानक रुतला
तुझे डोळे सांगती मजला

कवी किरण

Saturday, August 21, 2010

मी एकटाच किनारी चुकलेलो ....


मी एकटाच किनारी चुकलेलो ....

दुखवून तुला का मजला आनंद होतो राणी
अश्रू वाहिले तिथे, इथे गालांवर ओघळले पाणी
एका चुकीला विसरून माझे प्रेम लक्षात येईल का
हि ऐलतीराची नाव, राणी पैलतीरावर जाईल का

तू सदैव माझ्यासाठी, केले रक्ताचे पाणी
दुर्लक्षित झाले सूर, अन विसरून गेलो गाणी
तोच कंठ पुन्हा एकदा, माझ्यासाठी गाईल का
हि ऐलतीराची नाव, राणी पैलतीरावर जाईल का

तू शीतल सरीतेसारखी मी अवखळ सागर आहे
तू अथांग विश्व प्रेमाचे मी रीतीच घागर आहे
बोल राधे तुझा नि माझा सुरेल संगम होईल का
हि ऐलतीराची नाव, राणी पैलतीरावर जाईल का

चुकलो मी नाही कळले, शब्दात जाहला घोळ
मग क्षणात बिथरून गेला, प्रेमाचा झाला खेळ
मी एकटाच उभा किनारी तुजवीण जीव हा राहील का
हि ऐलतीराची नाव, राणी पैलतीरावर जाईल का

कवी किरण

आरसा


आरसा

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
तुला कळेल तू किती लाडकी आहेस कुणासाठी
तुझी अदा किती गोड,
तू इतकी सुंदर कशासाठी ....

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
खूप काही वेगळं दिसेल तुला
जे तू यापूर्वी कधीच पाहिलं नव्हत
काहीतरी आश्चर्यचकित करणारं
जे अगोदरही तुझ्या अगदी जवळ होतं

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
गालांवर ओघळेल तुझ्या लाली
सेच्कांदागानिक मिचमिचणाऱ्या
तुझ्या पापण्या वरखाली

आरश्यात बघ माझ्या नजरेतून

आणि हो नजर काढ बरं स्वतःची
लागू नाय याच्यासाठी
कारण तुझी अदा किती गोड,
तू इतकी सुंदर कशासाठी ....

दिवसा फोन रात्री एस एम एस... !


हि कविता त्या वेड्या प्रेयासिंना समर्पित ज्या आपल्या प्रियकरासाठी दिवसरात्र मोबाईल वेड्या आहेत.....



दिवसा फोन रात्री एस एम एस... !



पूर्ण दिवसभरात मी, इतके फोन करते

तरी रात्री डोळे फाडून, एसेमेस तुला करते



घरच्यांना लपवून हळूच, चादरीत घुसून बसते

तुझे रिप्लाय वाचून, गालातल्या गालात हसते

कुणी येतंय कळताच, झोपायचं नाटक करते

रात्री डोळे फाडून, एसेमेस तुला करते



खूप वेळ टाईप करून दुखू लागते बोट

खूप वेळ पाण्याविना सुकतात माझे ओठ

आठवणीच्या अश्रूंनी मग त्यांना ओले करते

रात्री डोळे फाडून एसेमेस तुला करते



कुणी विचारताच.. “झोप येत नाही !” कारण दिलं जातं

भीती वाटते जेव्हा हे सारं मोठ्यांच्या लक्षात येतं

मोबाईल मग हातात लपवून दुसऱ्या कुशीत फिरते

रात्री डोळे फाडून एसेमेस तुला करते



कळत नाही बोलता बोलता अर्धी रात्र होते

सकाळी पुन्हा लवकर उठायचं... याची याद येते

अर्ध्या रात्री नंतर मग “गुड नाईट” तुला करते

चोवीस तासाचे घड्याळ माझे तुझ्याच साठी फिरते !



कवी किरण

Wednesday, August 18, 2010

बाईकवरची धूम ......


बाईकवरची धूम ......

चंद्रालाही लाजवून गेलं असं तुझं हसणं,
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

भेटण्यापर्यंतची अगतिकता, कोंडलेला श्वास
त्यात ट्राफिक, धूळ आणि ट्रक टेम्पोंचा त्रास
मिळेल तसा रस्ता काढत फुटपाथवरून घुसणं
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

मग तू दिसतेस लांबून, वाट बघत थकलेली
इतरांच्या चेहऱ्यांना उत्तर देत, उभ्या उभ्या पकलेली
हिरमुसलेला चेहरा आणि खूप सार रुसणं
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

पाच दहा मिनिटं काही बोलणं होत नाही
लांब रेटल जात, जवळ घेणं होत नाही
रागावलेल्या राणीचं, रुसून फुगून बसण
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

थोडावेळ गेल्यानंतर, पंचनामा होतो
उशीर का केला, म्हणून सगळी कारण देतो
त्यांनंतर हळू हळू, पुढे सरकून बसणं
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं

मग सुरु राजा राणीचा, स्वप्नंनगरीचा प्रवास
घट्ट बसते मिठी आणि मोकळे होतात श्वास
खांद्यावरती हात सरकतो, कठीण होता सुचण
खूप आवडतं बाईकवर, तुझ्या सोबत असणं




रोमांचित होताहोता, हॉटेल जवळ येत
कोणी नाही, नजर चुकवून मगच जाता येत
तिथे सुद्धा, हातात तुझं हात घेऊन बसणं
खूप आवडतं बाईकवर तुझ्या सोबत असणं

बिल चुकतं, मन थकत,निघायचे वेध लागतात
डोळे मग दोघांचेही, घड्याळाकडे बघतात
मग मात्र चालू होतं, मनात धूस पुसणं
खूप आवडतं बाईकवर तुझ्या सोबत असणं

निघता निघता रात्र होते, चांदण पडलेलं असतं
हातांनी तुझ्या कवेत मला,घट्ट धरलेलं असतं
पुन्हा नॉर्मल होतं, मग सरकून बसणं
खूप आवडतं बाईकवर तुझ्या सोबत असणं

निरोप घेतेस, निघून जातेस, आठवणी मात्र तश्याच राहतात
मिरर मध्ये पुन्हा पुन्हा, तुलाच माझे डोळे पाहतात
परत कधी ? या उत्तराची वाट बघत बसणं
खूप आवडतं बाईकवर तुझ्या सोबत असणं

कवी किरण

Friday, August 13, 2010

स्वातंत्र्य दिन


स्वातंत्र्य दिन

शहीदांनी साजरा केला होता...

ब्रिटीश राजवटीतून आता हिंदुस्तान एक स्वतंत्र राष्ट्र होणार म्हणून ...
जगाच्या नकाश्यावर आता भारत छापून येणार म्हणून...
स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार म्हणून ...
प्रत्येक वेळी तिरंगा अभिमानानं सलाम घेणार म्हणून...


आम्ही आमचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय....

रविवारी १५ ऑगस्ट येतोय म्हणून एक सुट्टी गेली याचा खेद व्यक्त करत,
जमतील तितकी टाळकी गोळा करून मागच्या वर्षी साजरा केला म्हणून या वर्षी सुद्धा... रडत रडत,
तिरंगी रंगाचे कपडे घालून मी कसा किंवा कशी दिसतेय या आनंदात जगत,
आणि रोजच्या सिरीयल मधून रिमोट ने अधून मधून न्यूज वरच्या परेड बघत...

मग आता मी काय करू त्याला.... ?

असा प्रश्न निर्माण झाला असेल तर बरंच काही आहे करण्यासारखं...
या स्वातंत्र्य दिनी एक स्वप्नं बघून पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण करण्यासारखं

नॉट नेसेसरी .... आपण लढायला जायला हवं...
पण आपल्या कडे जे आहे त्यातलं थोडं गरिबाला द्यायला हवं
शिक्षण पासून जे वंचित आहेत त्यांना जगण्यापुरतं शिकवायला हवं
आपल्या मुलाने सुद्धा जवान होण्याचा स्वप्न पाहायला हवं
हा अगदीच तितकी ताकद नसेल
तर इंजिनियरिंग करून भारतात राहायला हवं

तेव्हा नुसतंच “ भारत माता कि जय !” म्हणण्यापेक्षा
आज देशाला गरज आहे
तुमच्या मनातल्या आवाजाची...
एक नवी क्रांती घडवण्याच्या
काही नव्या रिवाजांची...
चला काहीतरी चांगल मनाशी ठरवू
आणि आपल्या देशाला जे खरच हवंय ते... जमेल तितकं पुरवू
.

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.....
कवी किरण

Saturday, August 7, 2010

गुड मॉर्निंग !!!!


सकाळीच तुझी आठवण आली
कानात काहीतरी बोलून गेली
स्वप्नात रात्री काय काय घडलं
सारी गुपितं खोलून गेली

आता दिवस कसा सुखाचा जाईल
काहीवेळाने तुझा फोनही येईल
दुधात खरी साखर पडेल
जेव्हा तुझ्या आवाजात गुड मॉर्निंग होईल

फोन नाही जमला तर एसेमेस कर
तेही नाही जमलं तर माझं नाव मनात धर
घाबरू नकोस मी रागावणार नाही
वाट बघेन तुझी आयुष्यभर

किती वेळ


तू तिथे आणि मी इथे..
असं कसं बरं चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

खूप झाला विरह आणि
खूप झालं काम
भेटली नाहीस तर घ्यावं लागेल,
कायमचं हरीनाम
किती दिवस किनाऱ्यावर,
असं एकट्याने चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

करियर पैसा बंगला गाडी,
सगळं सगळं विकत मिळतं
आपलं कुणी हक्काचं हवं,
हे बहुतेकांना उशिराच कळतं
असं काळ वेळ ठरवून बोलणं,
आपल्यात नाही बुवा चालायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

ठावूक आहे नुसत्या प्रेमाने,
सारे प्रश्न सुटणार नाही
पण प्रेम मोज्क्यांच्याच नशिबात असतं,
ते सारखं सारखं भेटणार नाही
वाटतं दूर हिंदोळ्यावर,
फक्त दोघांनीच झुलायचं
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

खूपच उशीर केलायस राणी,
म्हणून सांगतो थेट तुला
गुपचूप जशी भेटायचीस,
तशी हळूच येऊन खेट मला
मनाची समजूत घालून थकलो..
कि प्रेमात हे असं चालायचंच
किती वेळ आपण हे असं,
इतक्या दुरून बोलायचं

Wednesday, August 4, 2010

मांडीवरती डोकं ठेवून...


मांडीवरती डोकं ठेवून...



खूप झालीय धावपळ, थोडा आराम हवाय खरा,

मांडीवरती डोकं ठेवून...झोपू का गं जरा ?



सकाळ दुपार संध्याकाळ, कामात निघून जाते,

अधून मधून सारखी मला, तुझी आठवण येते,

पण मिळतो जेव्हा वेळ तेव्हा, वाजले असतात बारा !

मांडीवरती डोकं ठेवून...झोपू का गं जरा



ऑफिस संपताच आईचा फोन “राजे कुठे आहात?”

पप्पांचे डोळे असतात सारखे घड्याळाकडे पाहात

कधी संपणार आयुष्यातला हा ससेमिरा

मांडीवरती डोकं ठेवून...झोपू का गं जरा



वाटत दूर पळून जावं जंगलात कुठेतरी

जिथे नसेल वेळेसाठी अशी हेराफेरी

इतका प्रेम करेन कि म्हणशील तू लांबच बरा :-)

प्लीज...मांडीवरती डोकं ठेवून..झोपू का गं जरा



कवी किरण

Sunday, August 1, 2010

मैत्री....











मैत्री....

अपेक्षा नसतात आणि उपेक्षाही नसतात
मैत्रीत असते फक्त ओढ..एकमेकांसाठीची
नुसत्या आठवणीत सुद्धा ते एकमेकांना भेटतात,
गरज नसते .. खऱ्या भेटीची

मैत्री म्हणजे निस्वार्थीपणाचा आदर्श
मैत्री म्हणजे आपलेपणाचा प्रेमळ स्पर्श
उघड्या डोळ्यांनी पाहिलेली असतात ती स्वप्नं रेशिमगाठीची
मैत्रीत असते फक्त ओढ..एकमेकांसाठीची

मैत्री एक अलिप्त आयुष्य, या जगाहून नामानिराळं
मैत्री म्हणजे एकमेकांच्या बंधनात गुंफलेलं अथांग जाळं
त्यात असते ठेचून भरलेली हुरहूर कुणासाठीची
मैत्रीत असते फक्त ओढ..एकमेकांसाठीची

मैत्री एक असं क्षितीज आहे जिथे आभाळ जमिनीला टेकतं
मैत्री असं एक लव्हाळं आहे जे अहंकार सोडून मित्रांसाठी झुकतं
मैत्री असते सर्वाचा शेवट आणि सुरवात वेड्या प्रीतीची
मैत्रीत असते फक्त ओढ..एकमेकांसाठीची

कवी किरण