याला काय अर्थ आहे?

मनासारखं जगला नाहीत, तर सारं जीवन व्यर्थ आहे,
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
कुणाला तरी आवडेल म्हणून, नाटक करत बसायचं
मनात जरी द्वेष असला, तरी खोटं हसायचं..
उठतोय, झोपतोय, खातोय, पितोय.. काहींना यातच परमार्थ आहे
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
पैसा इज्जत शोहरत, सारं सारं निघून जाईल
जे करायचं राहिलं होतं, त्यात जीव अडकून राहील
देव पूजेमध्येसुद्धा, उरला फक्त स्वार्थ आहे
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
आम्ही नाही आत्महत्या, आणि खून करणारे
आम्ही तर आहोत मनाच्या, सौंदर्यावर मरणारे
आत्मा चिरंतन आहे, शरीर थोड्या वेळा पुरतं आहे
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
खूप कलाकार वेळ नाही, म्हणून रिकामी बसले आहेत
आयुष्याच्या रंगमंचावर, रोजच्या कामात घुसले आहेत
त्याला सुख कसं म्हणावं, जे तात्पुरतं आहे
जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
म्हणून जगा आवडेल तसं, कुणाचं नुकसान न करता,
आयुष्याला व्यसनांच्या, डोहामध्ये न भरता
स्वतःवरती प्रेम केलंत तर, तुमचा जन्म सार्थ आहे
कारण... जगायचं म्हणून जगायचं ! याला काय अर्थ आहे?
कवी किरण
Ekdum Manatala bolas!!!
ReplyDeleteDhanya ahes tu mitra :)